वर्षाऋतु – पावसाळ्या मध्ये आरोग्यपूर्ण निरोगी राहण्याचा आयुर्वेदिक मंत्र

best ayurvedic and panchakarma treatment for good health in hadapsar

चला दोस्तहो….. आरोग्यावर बोलू काही!!

आरोग्यपूर्ण निरोगी शरीर हे सर्व सुखांचे माहेरघर असते. आयुर्वेदाचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष:”

आयुर्वेद हा आयुष्याचा वेद असे म्हटले जाते. आजारी पडल्यावर औषधे घेणे किंवा उपचार घेणे हा एक भाग आहेच पण आजारी पडू नये म्हणून किंवा निरोगी राहावे स्वास्थ्याचे रक्षण व्हावे याकरिता आयुर्वेदात दिनचर्या व ऋतुचर्या याविषयी अतिशय समर्पक माहिती उपलब्ध आहे.
माणूस ज्या वातावरणात राहतो त्याप्रमाणे तो स्वतःला Adjust करतो यालाच आपण Adaptation असे म्हणतो, म्हणजे बाहेरील वातावरणाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तसेच ‘पिंडी ते ब्रह्माण्डी’ या न्यायाने शरीराच्या बाहेर जे बदल घडतात तसेच बदल शरीरात घडत असतात हे शाश्वत सत्य; आयुर्वेदाच्या अभ्यासातून प्रकर्षाने जाणवू लागते.

आयुर्वेदाचा पाया असलेले वात, पित्त, कफ हे त्रिदोष व बाहेरील सृष्टीतील पंचमहाभूते या सर्वांचा एकत्रित परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शरीर व मनावर जन्मापासून होतं असतो. उदा.वसंत ऋतू हा कफाचा काळ; ऊन जास्त असूनहि कित्येक लोकांना या काळात सर्दी होते.
याच अनुषंगाने आयुर्वेदात ऋतुचर्येचे वर्णन आले आहे. तसेच दिवसाच्या काळानुसार म्हणजे सकाळ ,दुपार, संध्याकाळी जसे वातावरणात बदल घडतात तसेच बदल मानवी शरीरात वात ,पित्त ,कफ यांमध्ये घडतात म्हणून आचार्यांनी दिनचर्येचे देखील वर्णन केले आहे.
दिनचर्या व ऋतुचर्या हे निरोगी आरोग्याचे मार्गदर्शक आहेत. त्यातील गोष्टींचे पालन तुम्हाआम्हाला नक्कीच ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम’ पर्यंत घेऊन जाऊ शकते.

ऋतूंचर्या हे आयुर्वेदाच्या सागरातील एक अनमोल रत्न म्हणता येईल.बाहेरील वातावरणाच्या बदलांप्रमाणे आहारात व विहारात केलेले
बदल हे तो ऋतू आनंददायी आणि आरोग्यपूर्ण करणारे ठरतात.

सध्या सगळीकडे छान पाऊस चालू आहे आणि त्या अनुषंगानेच
आज आपण पावसाळा -वर्षाऋतु विषयी थोडी माहिती घेऊ.

कडक उन्हाळ्यानंतर थंडगार सुटलेल्या वाऱ्याने;गार थेंबानी ओलाचिंब करून टाकणारा;हवाहवासा वाटणारा पावसाळा. पावसाची वाट तर प्रत्येक जण आतुरतेने पहात असतो. अशा या वर्षा ऋतूची सुरुवात ही नवचैतन्य निर्माण करणारीच असते.
परंतु जसें जसे दिवस पुढे सरकू लागतात तसे तसे वातावरणात दमटपणा येतो. सतत पडणारा रिमझिम पाऊस; उन्हाचा अभाव; चिखल ढग येणे इ.मुळे वातावरणात एकप्रकारचा अनुत्साह निर्माण होतो… या सर्व बदलांमुळे आपल्या शरीरात वात दोषाचे आधिक्य निर्माण होते. आयुर्वेदानुसार हा काळ ‘वात दोष प्रकोपचा’ असा मानला जातो. जुनाट वाताचे आजार या काळात तोंड वर करू पहातात.तसेच हाडांची, सांध्यांची दुखणी या काळात त्रास देतात.
वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, जंतुसंसर्ग या सर्वांना बळ मिळते.दमट हवा, गढूळ पाणी, सूर्यप्रकाशाचा अभाव आदी. कारणांमुळे जंतूंचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवतो व माणूस अनेक आजारांना बळी पडतो.

या काळात अग्निमांद्य ( भूक कमी होणे) प्रकर्षाने जाणवते. भूक न लागणे, पचन न होणे ,पोटात गुबारा धरणे, जुलाब होणे, उलटी, ढेकर आदी तक्रारी सुरु होतात.
म्हणूनच या काळात पाणी उकळून थंड करून मगच पिणे इष्ट. तसेच सिध्द जल (काही औषधी द्रव्ये mix केलेले पाणी) या काळातील अपचन व वातप्रकोप यांकरिता सर्वोत्तम.

आयुर्वेदात वर्षा ऋतूत “बस्ति” हे पंचकर्म करावे असे वर्णन आहे. आयुर्वेदामध्ये बस्ति ही ‘अर्धचिकित्सा’ म्हणून प्रसिध्द असून ‘वात’ दोषावर काम करणारा उपक्रम आहे.
वर्षा ऋतूमध्ये वाताचे विकार असलेल्या लोकांनी तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आजारानुसार बस्ति पंचकर्म केलेले चांगले तसेच स्वस्थ व्यक्तींनीसुद्धा या काळात बस्ति पंचकर्म केलेले चांगले जेणेकरून तीनही दोषांमधील प्रबळ असा वात नियंत्रणात राहील.
वर्षा ऋतूतील बदल लक्षात घेता अग्निमांद्य आदी कमी करण्यासाठी आहारामध्ये उष्ण तीक्ष्ण गुणांच्या द्रव्यांचा समावेश असावा.उदा.आलं, लसूण ,कांदा, सर्व प्रकारचे मसाले ,वेलची, दालचिनी ,मिरे ,लवंग etc. प्रामुख्याने आले, जिरे ,हींग व पुदिना.

वर्षा ऋतू चा काळ म्हणजेच आपण ज्याला ‘चातुर्मास’ म्हणतो तो काळ. अनेक सणावारांनी नटलेला हा ऋतू.या प्रत्येक सणांना विशिष्ट अशा वनस्पतींचे वर्णन आढळते.हे वर्णन वातावरणातील घडणारे बदल शरीरात सामावून घेऊन स्वास्थ बिघडू न देणे या हेतूने केलेले आहे उदा. श्रावणातील विविध वारांमध्ये काही विशिष्ट वनस्पती द्रव्ये वापरावीत असा उल्लेख आहे. उदा.शिवामूठ. तांदूळ, जवं, तीळ, गहू हे पदार्थ, हे त्या त्या काळात घडणाऱ्या बदलांवर उत्तम antidote म्हणून कार्य करतात.तसेच चातुर्मासाचा संपूर्ण काळ हा विविध उपवासानी नटलेला आहे .या काळात उपवासमार्फत पचनसंस्थेला जास्तीत जास्त विश्रांती मिळावी हा उद्देश आहे.

नाहीतर ‘एकादशी दुप्पट खाशी‘ अशी गत होते. उपवास याचा अर्थ देवाच्या सानिध्यात राहणे म्हणजेच स्वत्व शोधणे. यात ध्यान ,धारणा आदींचा समावेश होतो.
सध्या उपवासाला खाण्यात येणारे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी , milk shakes, बटाटा ,रताळी आदींमुळे उपवासाचा मूळ उद्देश जाऊन व्याधींना आमंत्रण दिले जाते. मूळातच असलेल्या अग्निमांद्यात या वरील पदार्थनी भर पडते व आजार निर्माण होतात. म्हणूनच या काळात विविध फळे ,ताक, दूध, तूप आदींवर जास्त भर द्यावा. पचनास जड पदार्थ शक्यतो लांब ठेवावेत.

अशा प्रकारे ऋतूमधील बदलांचा विचार करून त्याप्रमाणे आहार इत्यादी मध्ये बदल केल्यास तुम्हा आम्हाला हा वर्षाऋतु नक्कीच आरोग्यदायी ठरेल.

धन्यवाद!!!

©®डॉ. स्वाती नलगे
डॉ. दत्तात्रय नलगे
आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, गर्भसंस्कार केंद्र
हडपसर, पुणे